Thursday, August 20, 2020

झुरणं

झुरणं

झुरणं झुरणं म्हणजे काय ते मला आता कळतंय
कोरड्या डोळ्यांमधून, जणू अखंड पाणी गळतंय ।।

डोळे देखील अश्रूंची आता वाट पाहू लागलेत 
झुरत झुरत .. मला थोडी साथ करू लागलेत ।।

हुंदके देऊन आतड्यांना पडतायत शेकडो पीळ
डोळे म्हणतात मला, "वेड्या सगळं सगळं गीळ" ।।

डोळ्यांचंही बरोबर आहे, यात त्यांचा काय दोष
चूक माझी, माझ्या मनाची, उगा त्यांच्यावर का रोष ।।

मनाला परवा मी दामटवल म्हणालो "बस्स झालं आता कंट्रोल"
बंड करून म्हणालं, "अरे तीच इंजिन ऑइल अणि पेट्रोल" ।।

कसंबसं समजावलं त्याला म्हणलो, "चेंज युअर पेस"
सगळंच कास एकदम हवं,, "स्लो अँड स्टडी वीन्स द रेस" ।।

आता कुठे हलकं वाटतंय, मोठं वादळ नुकतच सरलंय
डोळ्यांखाली मात्र, एक काळ वर्तुळ उरलंय... एक काळ वर्तुळ उरलंय ।।

- विशाल आपटे (अवि)

चांदण्यांच गाव

चांदण्यांच गाव

दूर तिथे क्षितिजावर चांदण्यांचं गाव
रोज सकाळी माझ्या ओठी पाहिल तुझं नाव ।

मी चांदण्या मोजता मोजता तुला शोधून पाहिलं
पूर्ण गावभर हिंडलो पण तुझचं घर राहील ।

खूप खूप फिरलो पण तू नाही दिसलीस
का कुणास ठाऊक तरीही जवळची वाटलीस ।

नंतर एक दिवस कळलं की तू नव्हतीसच घरी 
तूच होतीस गावमधल्या चांदण्यांची परी ।

तुझ्या त्या गावामध्ये मला का ग प्रवेश नाही
खरं खरं सांग माझं चुकलं का ग काही ।

तेवढ्यात कुठून एक ढग क्षितिजवरती येतो
चांदण्यांच ते गाव हलकेच मिठीत घेतो ।

पुसून टाकतो सर्व काही जातो स्वतः विरून
तुझ्या माझ्या सर्व जागा मी पाहतो पुन्हा फिरून ।

तू इथे नसलीस तरी आठवण येते खूप
भडभडणाऱ्या जखमेवरती तेवढचं साजूक तूप ।। (२)

विशाल आपटे (अवि)

Tuesday, August 4, 2020

कविता

कविता

कर म्हणून होत नाही कविता सुचावी लागते
वाचणाऱ्याच्या काळजापर्यंत थेट पोचवी लागते
शब्दांच्या महासागरातून नेमकी वेचावी लागते
विचारांची सांगड घालून अलगद जुळावी लागते
कर म्हणून होत नाही ।।

छंद मात्र आणि यमकाची साथ मिळावी लागते
शब्दांच्या योग्य वजनाने नीट तोलावी लागते
तरी कवीच्या मनातलं नेमकं तेच बोलावी लागते
कर म्हणून होत नाही ।।

समाजाशी समरस होऊन आपलीशी वाटावी लागते
लहान मोठया सर्वांनाच सहज कळावी लागते
"आगदी मनातलं लिहिलंय" अश्शी वाटावी लागते
कर म्हणून होत नाही ।।

बधिर झालेल्या कानांमध्ये वेळी किंचाळावी लागते
ऑफिस मधल्या फाईलिंप्रमाणे खूपदा धुंडाळावी लागते
अन फारच जर का लांबली तर अशी गुंडाळावी लागते
कर म्हणून होत नाही ।।

- विशाल आपटे (अवि) ०९.०४.२०१४

विठ्ठल

विठ्ठल

जात पात विठ्ठल
कर्म धर्म विठ्ठल
भाषा प्रांत विठ्ठल
शांत शांत विठ्ठल ।।

तुळशीहार विठ्ठल
सदाचार विठ्ठल
सुविचार विठ्ठल
सुसंस्कार विठ्ठल ।।

पायी पायी विठ्ठल
ठाई ठाई विठ्ठल
राई राई विठ्ठल
रखुमाबाई विठ्ठल ।।

अक्षरात विठ्ठल
आकारांत विठ्ठल
अंतरात विठ्ठल
अभंगात विठ्ठल ।।

एक नाम विठ्ठल
चार धाम विठ्ठल
शाम शाम विठ्ठल
मुखी नाम विठ्ठल ।।

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ।।।।

- विशाल आपटे (अवि)

बळीराजा

बळीराजा

सरळ साधे जगतो आम्ही पोट घेऊन हातावर
वाहतो ओझे दारिदऱ्याचे थकलेल्या या खांद्यांवर |
आमच्या नशिबी फक्त प्रतीक्षा जन्मच सरतो आशेवर
अश्रू देखील सुकून गेले तपलेल्या या गालांवर ||

सावकार अन पाटिल दादा शोषण करिती वरचेवर
भुमातेला गहाण ठेउन दिवस काढतो कर्जावर
कर्जाच्या फेर्यातून सुटका आता केवळ सरणावर
सरळ साधे .... ।।

गारपीट अन अतिवृष्टिचे प्रघात होती गावांवर
मृत्यूचे हे तांडव शमते चढ़वूनी आम्हां फासावर
कष्टकर्याची खिल्ली उडवत गम्मत बघतो सौदागर
सरळ साधे .... ।।

आजाराचे होउन कारण पंगुत्व येई अंगावर
कुपोषणही फणा काढुनी झड़प घालते पिल्लांवर
म्रत्यु देखील आतुरतेने दस्तक देतो दारावर
सरळ साधे ...... ।।


- विशाल आपटे (अवि) २३.०२.२०१६

Sunday, April 26, 2020

आई

आई

दुधावरची साय का काय ती
लेकराची माय का काय ती
गरीब बिचारी गाय का काय ती
तीच असते ना आई

ऑफिसच्या पार्टीत नवर्याला शोभणारी
लहानांशी लहान होउन बोबड बोलणारी
दू:खाचे डोंगर लीलया पेलणारी
तीच ... तीच असते ना आई

जगावरचा राग काढता येणारी
तापात डोक्यावर घड्या ठेवणारी
रात्रभर जागुन सकाळी वेळेत डबा देणारी
फ़क्त तीच .... तीच असते ना आई

पेन रुमाल पकिटच काय मोजेही काढून ठेवणारी
मानापमान विसरून सारी माणस जोडून ठेवणारी
मनाच्या खोल कोपर्यात कुठेशी स्वप्न कोंडून ठेवणारी
अगदी अशीच .... अशीच असते ना आई

कणखर खंबीर पण हळवी का काय ती
उदार प्रेमळ पण कठोर का काय ती
कालची आजची पण काळाच्या पुढची का काय ती
अगदि तीच ..... तशीच असते ना आई
अन हीच अशीच असते ना आई ......

- विशाल आपटे  १० मे २०१५

समांतर

समांतर

दोन विचारांच्या युद्धात नसतंच कुणी चूक अन बरोबर
जो तो असतो घट्ट आपापल्या मतांशी खरोखर |

एक विचार जुना तर दुसरा असतो नवा
पहिला येतो अनुभवातून तर दुसर्याला बदल हवा |

एक स्पष्ट, नेमकं बोट ठेवणारा
तर दुसरा मवाळ, अलवार नात जपणारा | 

एक करारी, काहीही किम्मत मोजणारा
तर दुसरा विचारी, तडजोडीची हिम्मत करणारा |

एक द्रष्टा, फार पुढचा विचार करणारा
तर दुसरा निर्धास्त, बेधडक, आला दिवस जगणारा ।

यातून एक निवडण्यावाचून नसलं जरी गत्यंतर
हे दोन्ही विचार अथांग अन त्यांचा प्रवास समांतर ।।

- विशाल आपटे २२ डिसेंबर २०१५

प्रगती

प्रगती

चौथरे राऊळांचे जिंकून काय होते
भक्तीची तहान आटून गेल्यावर ।

पाण्यावर महाचर्चा घडवून काय होते
तोंडचेच पाणी पळून गेल्यावर ।

विकासाचे झेंडे फडकावून काय होते
आरक्षणात सगळे करपून गेल्यावर ।

आठवीपर्यंत सर्वा ढकलून काय होते
शिक्षणातील ओढ हरवून गेल्यावर ।

गल्लोगल्ली पुतळे उभारून काय होते
त्यांच्याच स्वप्नांना विसरून गेल्यावर ।

अनुदानाची भीक वाटून काय होते
झाडास बळीराजा लटकून गेल्यावर ।

- विशाल आपटे १६ जून २०१६

दोस्ती

दोस्ती

तुमसे खफा होना हमे आता नही
तुम्हारा लापता होना हमे भाता नही ।
ऐसा क्या है तुझमे ए मेरे दोस्त
जो जानकर भी मै समझपाता नही ।।

तेरे रुठने के तरीके क्या हमे पता नही
फर्क बस इतना कि मै बतलाता नही
सोचता हू कि तुम खुद समझ जाओगे कभी
क्योंकि दोस्तीकी दास्तान-ए-हकीकत कभी कोई जताता नही ।। 

तुम्हारी तारीफ करनेमे मैं कभी हिचकीचाता नही
नेकी और सच्चाई को तो खुदा भी छुपाता नही
बस डरता हुं कि चुरा न ले तुम्हे कोई मुझसे
तभी अपने दोस्ती के किस्से में कही सुनाता नही

- विशाल आपटे

Saturday, March 28, 2020

घर


घर

भीती इथे कुणाला कुणाची
'कोरोना' हुन तर भयानक स्वतः आपण ।

नुसत्या वल्गना काय कामाच्या
स्वतः कधी बदलणार आपण ।

बंद दारे उघड्या खिडक्या
मनाची दारे कधी उघडणार आपण ।

घरी बसायची इथे सक्ती करावी लागते
'कोरोना' च्या कुबड्या कधी फेकणार आपण ।

एकमेकांपासून लांब लांब राहून
मनाने कधी जवळ येणार आपण ।

स्वतःच्याच घरात कैद झाले वाटते
घराला घरपण कधी देणार आपण ।

चूक झाल्याचे दुःख नाही
कुणी केली न कळण्याने दुःखी आपण ।

वेळ कधीच थांबत नाही
वेळेत थांबलो तरच जिंकलो  आपण ।।

- विशाल आपटे

Sunday, February 9, 2020

असूया


दिवस आणि रात्रीच एकदा असूयेपोटी भांडण होत

दिवस म्हणतो:

चंद्र कोरल्या रात्री नभी चांदण्यांची नक्षी
फिरतेस काळी शाल ओढून, उब घेऊन वक्षी 
घेतेस मनीचा ठाव, करवतेस स्वप्नांची सैर
ढगांशी तुझा घरोबा मात्र सावलीशी वैर
तुझा चंद्र शांत तेवतो, जसा अंधारात दिवा
सांग सजणे का नाही वाटणार मला तुझा हेवा ।।

यावर रात्र म्हणते:

तांबडं फुटताच सकाळ सकाळ कोंबडे देतात बांग
अवघी सृष्टी पुनर्जन्म घेते निद्रेला मारून टांग
सूर्याचा प्रत्येक किरण चैतन्य घेऊन येतो
मी पांघरलेली काळी शाल हलकेच ओढून नेतो
तिन्हीसांजेला वर आभाळी रोज रंग नवा
सांग सजणा का नाही वाटणार मला तुझा हेवा ।।

- अवि
१०.०२.२०१६

Thursday, January 16, 2020

बाप्पा

बाप्पा

बाप्पा राहिला लहान अन मूर्ती झाल्या मोठ्या
आरतीला येत नाही कुत्रं मात्र भरत चालल्या कोठ्या ।

हे भव्य सेट आणि पाहायला मोठ्या रांगा
देवत्व राहिलंय का देवात यांना कोणीतरी सांगा ।

विसर्जनाचा होतो इव्हेंट अन मीरवणुकीचा बढेजाव
तितकाच विसर्जनाला उशीर जितकं मोठं नाव ।

वाजत गाजत निघते यात्रा पण कसली विसर्जनाची (?)
नक्की कसला हा आनंद पर्वा करा रे जरा मनाची ।

देणगीचाही होतो लिलाव करोडोंचा तिजोरीत भराव
संस्थाच्या नावाखाली नेते करतायत डराव डराव ।

हा कुठलासा युवराज अन तो कुठलासा राजा
अरे तुमच्या या चढाओढीत हरवला रे बाप्पा माझा ।
तुमच्या या चढाओढीत हरवला रे बाप्पा माझा ।

- विशाल आपटे