Sunday, April 26, 2020

आई

आई

दुधावरची साय का काय ती
लेकराची माय का काय ती
गरीब बिचारी गाय का काय ती
तीच असते ना आई

ऑफिसच्या पार्टीत नवर्याला शोभणारी
लहानांशी लहान होउन बोबड बोलणारी
दू:खाचे डोंगर लीलया पेलणारी
तीच ... तीच असते ना आई

जगावरचा राग काढता येणारी
तापात डोक्यावर घड्या ठेवणारी
रात्रभर जागुन सकाळी वेळेत डबा देणारी
फ़क्त तीच .... तीच असते ना आई

पेन रुमाल पकिटच काय मोजेही काढून ठेवणारी
मानापमान विसरून सारी माणस जोडून ठेवणारी
मनाच्या खोल कोपर्यात कुठेशी स्वप्न कोंडून ठेवणारी
अगदी अशीच .... अशीच असते ना आई

कणखर खंबीर पण हळवी का काय ती
उदार प्रेमळ पण कठोर का काय ती
कालची आजची पण काळाच्या पुढची का काय ती
अगदि तीच ..... तशीच असते ना आई
अन हीच अशीच असते ना आई ......

- विशाल आपटे  १० मे २०१५

No comments: