बळीराजा
सरळ साधे जगतो आम्ही पोट घेऊन हातावर
वाहतो ओझे दारिदऱ्याचे थकलेल्या या खांद्यांवर |
आमच्या नशिबी फक्त प्रतीक्षा जन्मच सरतो आशेवर
अश्रू देखील सुकून गेले तपलेल्या या गालांवर ||
सावकार अन पाटिल दादा शोषण करिती वरचेवर
भुमातेला गहाण ठेउन दिवस काढतो कर्जावर
कर्जाच्या फेर्यातून सुटका आता केवळ सरणावर
सरळ साधे .... ।।
गारपीट अन अतिवृष्टिचे प्रघात होती गावांवर
मृत्यूचे हे तांडव शमते चढ़वूनी आम्हां फासावर
कष्टकर्याची खिल्ली उडवत गम्मत बघतो सौदागर
सरळ साधे .... ।।
आजाराचे होउन कारण पंगुत्व येई अंगावर
कुपोषणही फणा काढुनी झड़प घालते पिल्लांवर
म्रत्यु देखील आतुरतेने दस्तक देतो दारावर
सरळ साधे ...... ।।
- विशाल आपटे (अवि) २३.०२.२०१६
No comments:
Post a Comment