बाप्पा
बाप्पा राहिला लहान अन मूर्ती झाल्या मोठ्या
आरतीला येत नाही कुत्रं मात्र भरत चालल्या कोठ्या ।
हे भव्य सेट आणि पाहायला मोठ्या रांगा
देवत्व राहिलंय का देवात यांना कोणीतरी सांगा ।
विसर्जनाचा होतो इव्हेंट अन मीरवणुकीचा बढेजाव
तितकाच विसर्जनाला उशीर जितकं मोठं नाव ।
वाजत गाजत निघते यात्रा पण कसली विसर्जनाची (?)
नक्की कसला हा आनंद पर्वा करा रे जरा मनाची ।
देणगीचाही होतो लिलाव करोडोंचा तिजोरीत भराव
संस्थाच्या नावाखाली नेते करतायत डराव डराव ।
हा कुठलासा युवराज अन तो कुठलासा राजा
अरे तुमच्या या चढाओढीत हरवला रे बाप्पा माझा ।
तुमच्या या चढाओढीत हरवला रे बाप्पा माझा ।
- विशाल आपटे
No comments:
Post a Comment