Thursday, August 20, 2020

झुरणं

झुरणं

झुरणं झुरणं म्हणजे काय ते मला आता कळतंय
कोरड्या डोळ्यांमधून, जणू अखंड पाणी गळतंय ।।

डोळे देखील अश्रूंची आता वाट पाहू लागलेत 
झुरत झुरत .. मला थोडी साथ करू लागलेत ।।

हुंदके देऊन आतड्यांना पडतायत शेकडो पीळ
डोळे म्हणतात मला, "वेड्या सगळं सगळं गीळ" ।।

डोळ्यांचंही बरोबर आहे, यात त्यांचा काय दोष
चूक माझी, माझ्या मनाची, उगा त्यांच्यावर का रोष ।।

मनाला परवा मी दामटवल म्हणालो "बस्स झालं आता कंट्रोल"
बंड करून म्हणालं, "अरे तीच इंजिन ऑइल अणि पेट्रोल" ।।

कसंबसं समजावलं त्याला म्हणलो, "चेंज युअर पेस"
सगळंच कास एकदम हवं,, "स्लो अँड स्टडी वीन्स द रेस" ।।

आता कुठे हलकं वाटतंय, मोठं वादळ नुकतच सरलंय
डोळ्यांखाली मात्र, एक काळ वर्तुळ उरलंय... एक काळ वर्तुळ उरलंय ।।

- विशाल आपटे (अवि)

चांदण्यांच गाव

चांदण्यांच गाव

दूर तिथे क्षितिजावर चांदण्यांचं गाव
रोज सकाळी माझ्या ओठी पाहिल तुझं नाव ।

मी चांदण्या मोजता मोजता तुला शोधून पाहिलं
पूर्ण गावभर हिंडलो पण तुझचं घर राहील ।

खूप खूप फिरलो पण तू नाही दिसलीस
का कुणास ठाऊक तरीही जवळची वाटलीस ।

नंतर एक दिवस कळलं की तू नव्हतीसच घरी 
तूच होतीस गावमधल्या चांदण्यांची परी ।

तुझ्या त्या गावामध्ये मला का ग प्रवेश नाही
खरं खरं सांग माझं चुकलं का ग काही ।

तेवढ्यात कुठून एक ढग क्षितिजवरती येतो
चांदण्यांच ते गाव हलकेच मिठीत घेतो ।

पुसून टाकतो सर्व काही जातो स्वतः विरून
तुझ्या माझ्या सर्व जागा मी पाहतो पुन्हा फिरून ।

तू इथे नसलीस तरी आठवण येते खूप
भडभडणाऱ्या जखमेवरती तेवढचं साजूक तूप ।। (२)

विशाल आपटे (अवि)

Tuesday, August 4, 2020

कविता

कविता

कर म्हणून होत नाही कविता सुचावी लागते
वाचणाऱ्याच्या काळजापर्यंत थेट पोचवी लागते
शब्दांच्या महासागरातून नेमकी वेचावी लागते
विचारांची सांगड घालून अलगद जुळावी लागते
कर म्हणून होत नाही ।।

छंद मात्र आणि यमकाची साथ मिळावी लागते
शब्दांच्या योग्य वजनाने नीट तोलावी लागते
तरी कवीच्या मनातलं नेमकं तेच बोलावी लागते
कर म्हणून होत नाही ।।

समाजाशी समरस होऊन आपलीशी वाटावी लागते
लहान मोठया सर्वांनाच सहज कळावी लागते
"आगदी मनातलं लिहिलंय" अश्शी वाटावी लागते
कर म्हणून होत नाही ।।

बधिर झालेल्या कानांमध्ये वेळी किंचाळावी लागते
ऑफिस मधल्या फाईलिंप्रमाणे खूपदा धुंडाळावी लागते
अन फारच जर का लांबली तर अशी गुंडाळावी लागते
कर म्हणून होत नाही ।।

- विशाल आपटे (अवि) ०९.०४.२०१४

विठ्ठल

विठ्ठल

जात पात विठ्ठल
कर्म धर्म विठ्ठल
भाषा प्रांत विठ्ठल
शांत शांत विठ्ठल ।।

तुळशीहार विठ्ठल
सदाचार विठ्ठल
सुविचार विठ्ठल
सुसंस्कार विठ्ठल ।।

पायी पायी विठ्ठल
ठाई ठाई विठ्ठल
राई राई विठ्ठल
रखुमाबाई विठ्ठल ।।

अक्षरात विठ्ठल
आकारांत विठ्ठल
अंतरात विठ्ठल
अभंगात विठ्ठल ।।

एक नाम विठ्ठल
चार धाम विठ्ठल
शाम शाम विठ्ठल
मुखी नाम विठ्ठल ।।

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ।।।।

- विशाल आपटे (अवि)

बळीराजा

बळीराजा

सरळ साधे जगतो आम्ही पोट घेऊन हातावर
वाहतो ओझे दारिदऱ्याचे थकलेल्या या खांद्यांवर |
आमच्या नशिबी फक्त प्रतीक्षा जन्मच सरतो आशेवर
अश्रू देखील सुकून गेले तपलेल्या या गालांवर ||

सावकार अन पाटिल दादा शोषण करिती वरचेवर
भुमातेला गहाण ठेउन दिवस काढतो कर्जावर
कर्जाच्या फेर्यातून सुटका आता केवळ सरणावर
सरळ साधे .... ।।

गारपीट अन अतिवृष्टिचे प्रघात होती गावांवर
मृत्यूचे हे तांडव शमते चढ़वूनी आम्हां फासावर
कष्टकर्याची खिल्ली उडवत गम्मत बघतो सौदागर
सरळ साधे .... ।।

आजाराचे होउन कारण पंगुत्व येई अंगावर
कुपोषणही फणा काढुनी झड़प घालते पिल्लांवर
म्रत्यु देखील आतुरतेने दस्तक देतो दारावर
सरळ साधे ...... ।।


- विशाल आपटे (अवि) २३.०२.२०१६