आकाशगर्व
आकाशाला एकदा गर्व होतो.
आकाश (अहंकाराने):
अथांग मी असिम मी
अनादि मी अनंत मी ।
विशाल मी विराट मी
विजोड मी विनाश मी ।
अपार मी अपरंपार मी
विश्वनिर्मितीचा साक्षीदार मी ।
लक्ष दशलक्ष मी खर्व मी निखर्व मी
कल्प युग पर्व मी कालातीत सर्व मी ।
अणु ते परार्ध असे अद्वितीय पृष्ठ मी
कालचक्रात जेष्ठ, सर्व शक्तीत श्रेष्ठ मी
कालचक्रात जेष्ठ, सर्व शक्तीत श्रेष्ठ मी ।।
पृथ्वी (हसून):
निळाशार तू निराकार तू
निर्विकार परी निराधार तू ।
ना स्पंद तुला ना बंध तुला
ना स्पर्श तुला ना गंध तुला ।
तू एक पोकळी सर्व त्यात विलीन
तू विश्वव्यापी, झालास दिशाहीन ।
पंचतत्वातील एक पण शेवटचे तत्व तू
अहंकार ग्रस्त, विसरलास स्वत्व तू ।
हो जरा शहाणा, गर्व करतोस काय तू
क्षितिजाशी भेट, ठेव जमिनीवर पाय तू
क्षितिजाशी भेट, ठेव जमिनीवर पाय तू ।।
- विशाल आपटे (अवि)
No comments:
Post a Comment