दुःख
दुःख भोगले म्हणजे संपते ऐसे नाही
दुःख टाळले तरीही टळते ऐसे नाही
ना दुःख कुणाचे कधीही उसने घेता येते
दुःख जरी जाणवले तरी कळते ऐसे नाही ।
दुःखाचे खापर मग जो तो फोडू पाही ...
कुणा शनी आडवा येई
कुणा मंगळ सोडत नाही
कुणा वाटे नशीबच फुटके
कुणा रत्ने लाभत नाही ।
कुणी वारच सोडून पाही
कुणी नावच बदलून पाही
कुणी दिशा बदलतो घरच्या
परी दुर्दशाच सोडत नाही ।
राशिफल उघडून कोणी दिवसाचा डावच रचतो
डावाची उडते खिल्ली राशीला समजत नाही ।
नशिबाची नक्षी हाती जो तो घेऊन फिरतो
नक्षीतून भविष्यवाणी रेषांना उमगत नाही
कुणी शनिस घालून सा'कडे' त्याची मिन्नत करतो
हनम्याची दाऊन भीती तो वळतो ऐसे नाही
मंगळाला शोधून मंगळ कुणी त्याची किंमत करतो
मंगळावर लावून झेंडे तो फळतो ऐसे नाही ।
कुणी एक फकीर कुठेसा दुःखाशी सलगी करतो
तार्यांची करुनी फितुरी नशिबाची गम्मत बघतो
दुःखा चोराया आता काहिही उरले नाही
दुःखच उरले नाही वा सरले ऐसेही नाही ।।
- विशाल आपटे (अवि)
No comments:
Post a Comment