Monday, February 22, 2016

अनुप्रास

अनुवादात कळतो अर्थ
अनुभवात अनुभूती |
अनुदानात मिळे पुण्य
अनुष्ठानात प्रचिती ||

अनुमानात दिसतो अनुभव
अनुरोधात दिसतो आर्जव |
अनुकंपेत जन्मतो अनुराग
अनुग्रहात मिळते अनुमती ||

अनुदिनीत कळते आचरण
अनुक्रमात मिळतो संदर्भ |
अनुबंधात जडते प्रेम
अनुकूल काळात उन्नती ||

उत्तम ते करावे अनुकरण
ठेवावे आचरण त्या अनुरूपे |
न पहावे कुणा अनुसूचित
संत अनुसारणात सद्गती ||

- विशाल आपटे (अवि)

आनंदयात्रा

आनंदयात्रा

एकदा फेरफटका मारताना वाटेत "राग" भेटला
मला पाहून म्हणाला काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?
मी म्हटलं अरे नुकताच "संयम" पाळलाय घरात आणि "माया"पण माहेरपणाला आल्ये
तस तोंड फिरवून निघून गेला।

पुढे बाजारात "चिडचिड" गर्दीत उभी दिसली
खर तर हि माझी बालमैत्रीण
पण पुढे कौलेजात "अक्कल" नावाचा मित्र भेटल्यावर हिच्याशी संपर्क तुटला
आज मला पाहून म्हणाली अरे "किटकीट" आणि "वैताग" ची काय खबरबात ?
मी म्हटलं," काही "कल्पना" नाही बुवा हल्ली मी "भक्ती"ला कामावर ठेवल्यामूळे "आनंदा"त आहे"

पुढे जवळच्याच बागेत "कंटाळा" झोपा काढताना दिसला
मी नुकतीच "बोर" विकत घेतली होती "गंमत" म्हणून
माझं अन त्याच हाडवैर अगदी 36 चा आकडा
मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला
मी हि मग मुद्दाम "गडबडी"कडे लिफ्ट मागितली आणि तिथून सटकलो

पुढे एका वळणावर "दुःख" भेटलं
मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"
मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास?
आणि माझ्या बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी"
तस "लाजून" म्हणालं, "अरे पाचवीला पडलो(पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात, कस काय सर्व ? घरचे मजेत ना?". 
मी म्हणालो, "छान आहे सर्व. "श्रद्धा" आणि "विश्वास" असे दोन भाडेकरू ठेवलेत त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. तू नको "काळजी" करूस".
हे ऐकल्यावर "ओशाळलं" आणि निघून गेलं.

थोडं पुढे गेलो तोच "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला हिणवत होत, "धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय".
मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झाली रे. एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकट पाडलत दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला. मी शोधल्ये माझी "शांती" आणि घराचं नाव 'समाधान" ठेवलंय."

तसं हसलं माझ्याकडे पाहून आणि परत पाठ फिरवून निघून गेलं माझा मित्र "मत्सर"च्या हातात हात घालून अन मला "इर्षे"च्या विळख्यात ढकलून.

- विशाल आपटे (अवि)

खरं प्रेम

पापण्यांना भार व्हावा इतुके कधी रडवू नको ।

मी तुला दिसता कधी, नजर रोखुनी जाळू नको .... पण
पापण्यांना भार व्हावा इतुके कधी रडवू नको ।

गंध जो माझ्या मनीचा, तो मोगरा माळू नको .... पण
पापण्यांना भार व्हावा इतुके कधी रडवू नको ।

मी कधी स्वप्नी उतरता, झोप तू टाळू नको .... पण
पापण्यांना भार व्हावा इतुके कधी रडवू नको ।

मी जरी कळलो कधी.......
मी जरी कळलो कधी तर चार अश्रू गाळू नको .... पण
पापण्यांना भार व्हावा इतुके कधी रडवू नको ।
पापण्यांना भार व्हावा इतुके कधी रडवू नको ।।

- विशाल आपटे (अवि)

हसरे दुःख

हसरे दुःख

रडलो म्हणजे सर्व संपले ऐसे नाही
रडलो म्हणजे दुःख बिलगले ऐसे नाही

हसलो जरिही घात फुलाने केला
रडलो जेव्हा खपली धरली नाही
रडलो होतो सुखात सुद्धा केव्हा
हसता हसता रडणे नवीन नाही ।

हसलो दिसता, डोळ्यात तुझ्याहि स्वप्ने
तव ज्या स्वप्नांशी तू, सौदा केला नाही
अन रडलो बघून उंच तुझी भरारी
गहिवरून आलो होतो, पिळवटून ऐसे नाही ।

हसलो होतो सुखात पाहून तुजला
अन मी त्या सुखात नसून, रडलो नाही
परी जेव्हा दिसले तुझ्याच नयनी अश्रू
रडणे देखील आता माझे उरले नाही ।। (2)

- विशाल आपटे (अवि)

दुःख

दुःख

दुःख भोगले म्हणजे संपते ऐसे नाही
दुःख टाळले तरीही टळते ऐसे नाही
ना दुःख कुणाचे कधीही उसने घेता येते
दुःख जरी जाणवले तरी कळते ऐसे नाही ।

दुःखाचे खापर मग जो तो फोडू पाही ...

कुणा शनी आडवा येई
कुणा मंगळ सोडत नाही
कुणा वाटे नशीबच फुटके
कुणा रत्ने लाभत नाही ।

कुणी वारच सोडून पाही
कुणी नावच बदलून पाही
कुणी दिशा बदलतो घरच्या
परी दुर्दशाच सोडत नाही ।

राशिफल उघडून कोणी दिवसाचा डावच रचतो
डावाची उडते खिल्ली राशीला समजत नाही ।
नशिबाची नक्षी हाती जो तो घेऊन फिरतो
नक्षीतून भविष्यवाणी रेषांना उमगत नाही

कुणी शनिस घालून सा'कडे' त्याची मिन्नत करतो
हनम्याची दाऊन भीती तो वळतो ऐसे नाही
मंगळाला शोधून मंगळ कुणी त्याची किंमत करतो
मंगळावर लावून झेंडे तो फळतो ऐसे नाही ।

कुणी एक फकीर कुठेसा दुःखाशी सलगी करतो
तार्यांची करुनी फितुरी नशिबाची गम्मत बघतो
दुःखा चोराया आता काहिही उरले नाही
दुःखच उरले नाही वा सरले ऐसेही नाही ।।

- विशाल आपटे (अवि)

आकाशगर्व

आकाशगर्व

आकाशाला एकदा गर्व होतो.

आकाश (अहंकाराने):

अथांग मी असिम मी
अनादि मी अनंत मी ।

विशाल मी विराट मी
विजोड मी विनाश मी ।

अपार मी अपरंपार मी
विश्वनिर्मितीचा साक्षीदार मी ।

लक्ष दशलक्ष मी खर्व मी निखर्व मी
कल्प युग पर्व मी कालातीत सर्व मी ।

अणु ते परार्ध असे अद्वितीय पृष्ठ मी
कालचक्रात जेष्ठ, सर्व शक्तीत श्रेष्ठ मी
कालचक्रात जेष्ठ, सर्व शक्तीत श्रेष्ठ मी ।।

पृथ्वी (हसून):

निळाशार तू निराकार तू
निर्विकार परी निराधार तू ।

ना स्पंद तुला ना बंध तुला
ना स्पर्श तुला ना गंध तुला ।

तू एक पोकळी सर्व त्यात विलीन
तू विश्वव्यापी, झालास दिशाहीन ।

पंचतत्वातील एक पण शेवटचे तत्व तू
अहंकार ग्रस्त, विसरलास स्वत्व तू ।

हो जरा शहाणा, गर्व करतोस काय तू
क्षितिजाशी भेट, ठेव जमिनीवर पाय तू
क्षितिजाशी भेट, ठेव जमिनीवर पाय तू ।।

- विशाल आपटे (अवि)

उत्तरे

उत्तरे


काही न विचाररताच कळलेली
काही ओठातून मागे वळलेली
काही देण्या आधीच टळलेली
काही अश्रूंवाटे गळलेली .... उत्तरे

काही होकारासाठी थांबलेली
काही न मिळताच लांबलेली
काही नाकाला मिरच्या झोंबलेली
काही मारून मुटकून कोंबलेली ... उत्तरे

काही खऱ्या आनंदाला मुकलेली
काही सगळीच गणितं चुकलेली
काही पैशासाठी विकलेली
काही गळवासारखी पिकलेली ... उत्तरे

काही सूडाने देह पेटलेली
काही दुःख मनात गोठलेली
काही रोजच्या त्रासाला विटलेली
काही शेवटच्या पापण्या मिटलेली ..... उत्तरे ..... फक्त उत्तरे

- विशाल आपटे (अवि)

दिवसरात्र

दिवसरात्र

दिस पांढरा पांढरा
जसा ससा गोरापान
रात काजळली काळी
जस विठोबाच ध्यान ।

दिसा सोबत सूर्याची
दोघा प्रेम जीवापाड
चंद्र रातिला उनाडे
कुणा डोंगराच्या आड।

रातदिस खेळ चाले
पाठशीवणीचा खास
दिस होई मोठा मोठा
वर्षाकाठी सहा मास ।

चंद्र खेळे लपंडाव
राती चांदण्यांच्या संग
पहाटेला नभांगणी
सूर्य उधळतो रंग ।

दिस थरारते सृष्टी
पान पान होई जागे
मुक्या थकलेल्या जीवा
कूस रातीचीच लागे ।

राती भयाण काळोख
त्यात गुपित दडली
दिस उजाडता दारी
उन्हें येऊन पडली । (2)

- विशाल आपटे (अवि)