Friday, August 26, 2011

होय मी शोधतोय

होय मी शोधतोय .....

टिळकांच्या भाषणांना फक्त स्पर्धांसाठी घोकतोय

पाठ करून गुळगुळीत झालेले विचार तोंडावर फेकतोय
होय मी शोधतोय
त्यांच्या लिखाणाइतकाच परखड आवाज मी शोधतोय
होय मी शोधतोय

गांधीजींच कर्तुत्व फक्त नोटांमध्ये मोजतोय

आणि त्याच नोटांसाठी वेळी स्वाभिमानही विकतोय
होय मी शोधतोय
त्यांच्या सत्याग्रहाइतक निर्धारी नेतृत्व मी शोधतोय
होय मी शोधतोय

विदेशी कंपन्यांच्या मस्टरवर आजही सही ठोकतोय

त्यांच्या प्रलोभनांना हसत हसत बळी पडतोय
होय मी शोधतोय
स्वदेशीचा पुरस्कार करणारे आदर्श मी शोधतोय
होय मी शोधतोय

इंग्रजांनी भ्रष्ट नेत्यांना आंदण दिलेलं स्वातंत्र्य उपभोगतोय

यथेच्च मुकामार खाल्यावर माझी मीच पाठ शेकतोय
होय मी शोधतोय
लोकशाहीचा खरा अर्थ मी संविधानात शोधतोय
होय मी शोधतोय

खुलेआम बोकाळलेला स्वैराचार तरी कुठे रोकतोय ?

क्रांतीच्या मशालीसाठी तेलाची भिक मागतोय
होय मी शोधतोय
गोळ्या छातीवर झेलणारी पोलादी मन मी शोधतोय
होय मी शोधतोय
- विशाल आपटे
सौजन्य - इतना क्यूँ सोते है हम - प्रसून जोशी

Saturday, August 20, 2011

भक्ती

भक्ती
भक्तीची तहान | देव अधिष्ठान |
दु:ख ते लहान | होत असे ||

मुखी राम नाही | मनी विष राही |

दुजे नीच पाही | अहंकारे ||

राम एक ध्यास | मनी त्याचा वास |

भक्तीचा सुवास | दरवळे ||

रूप ते नश्वर | काम क्रोध ज्वर |

स्मरावा ईश्वर | ब्रह्मानंदे ||

नामाचा उच्चार | मनाचा निर्धार |

आत्म्याचा उद्धार | करू शके ||

- विशाल आपटे


काही तुला बोलायचे

काही तुला बोलायचे काही मला सांगायचे
हसवायचे रडवायचे तरीही मना रीझवायचे || धृ ||

तुटतात धागे माझ्या मनीचे
सांगू कुणा मी जीवाच्या व्यथा
पानांप्रमाणे गळतात स्वप्ने
झाली तयांची सांगता
वाटे नव्याने फिरुनी उठावे
मनाने मनाला फसवायचे || ||

( चाल - एकाच या जन्मी जणू )

- विशाल आपटे

Monday, August 15, 2011

आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली

आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली .....

क्रांतिकारकांच्या क्षोर्याने छाती फुलून आली
केवळ पुण्यतिथीलाच हारांची आठवण झाली
इतिहासाची चळवळ केवळ पुस्तकांनाच कळाली
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली ||

भ्रष्टाचाराने खाबुगीरीची वृत्ती चळाली
अण्णांच्या हाकेला साद लोकांची मिळाली
लोकपालात आघाडीची फोडणी जळाली
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली ||

कसाब आणि अफजल ला ठेवले महाली
दयेचा अर्ज राष्ट्रपतींच्या हवाली
कायद्यातून शिक्षेची भीतीच पळाली
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली ||

- विशाल आपटे